satyaupasak

Ashok Chavan : शक्तीपीठ महामार्गाला माझाही विरोध, मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पर्याय शोधण्याचा प्रयत्न; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी देण्यास नांदेडमधील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे माझा देखील या प्रकल्पाला विरोध असून, शेतकऱ्यांचे जे मत आहे, त्याच मताशी मी सहमत असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

Ashok Chavan, Nanded : शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी देण्यास नांदेडमधील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाला माझाही विरोध असून, शेतकऱ्यांचे जे मत आहे, तेच माझं मत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले आहे. यासंदर्भात काही पर्याय उपलब्ध असतील का, हे तपासावे लागेल, असेही खासदार अशोक चव्हाण यांनी नमूद केले. याबाबत मार्ग काढता येईल का हे पाहण्यासाठी ते शेतकऱ्यांना भेटणार असून, त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टला अनेक जिल्ह्यांतून विरोध
राज्यातील दळणवळण सुविधा, व्यावसायिक संधी, आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाचे काम सर्व संबंधितांच्या विश्वासात घेऊन सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे नुकत्याच पार पडलेल्या आगामी 100 दिवसांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

तथापि, राज्यातील अनेक भागांतून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे. शक्तीपीठ महामार्गातून (Shaktipeeth Expressway) ज्या पद्धतीने कोल्हापूरला वगळण्यात आले, त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यालाही वगळावे, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी दिला आहे.

आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत नाही. शक्तीपीठासाठी रत्नागिरी-नागपूर हा पर्यायी मार्ग आहे. याच मार्गाला शक्तीपीठ जोडावे. ज्या भागांतील शेतकरी जमिनी देण्यासाठी तयार आहेत, त्या ठिकाणच्या जमिनी घेतल्या जाव्यात. तासगाव, मिरज या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. नियोजित शक्तीपीठ हा खरोखरच शक्तीपीठाला जोडणारा मार्ग आहे की इतर उद्देशाने तयार केलेला मार्ग आहे? कमी खर्चात जमीन संपादन करून त्यासाठी अधिक खर्च करण्यासाठी हा प्रकल्प आहे का, अशी शंका येते, असेही विशाल पाटील म्हणाले.

जे शेतकऱ्यांचे मत, तेच माझे मत – अशोक चव्हाण
दुसरीकडे, शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली यांनंतर आता हिंगोली जिल्ह्यातूनही विरोध होतो आहे. या महामार्गासाठी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांतील 27 हजार हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातीलही शेतजमिनींचा समावेश असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. त्यातच आता खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड संदर्भात बोलताना शेतकऱ्यांचे जे मत आहे, तेच माझे मत असल्याचे प्रतिपादन केले आहे.

कोणत्या देवस्थानांना हा शक्तीपीठ महामार्ग जोडणार?
कोल्हापूर – अंबाबाई, तुळजापूर – तुळजाभवानी, नांदेड – माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापूरचे सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर ही बारा देवस्थाने या महामार्गाने जोडली जाणार आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *